तळोदा:-(सुधाकर मराठे) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून शहरात वाढीव दराने विक्री सुरू आहे. पुरवठा विभाग सांभाळणारे याकडे कानाडोळा करत असून अजून तक्रार येण्याची वाट पाहत आहेत. तक्रार आली की आम्ही कारवाई करणार असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ग्राहकांना पक्के बिल मिळत नसल्याने तक्रार करणे अवघड होतं आहे. परिणामी शहरात ग्राहकांची लूट सुरू असून अद्याप एकाही रीतसर तक्रार दाखल नसल्याने व्यापाऱ्यांवर वचक नसल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांना आता व्यापाऱ्यांनीही लुबाडण्यास सुरुवात केली आहे. मालाचा पुरवठाच झालेला नाही, शिल्लक काही नाही, आम्ही माल कसे आणतो आम्हालाच माहीत, वरूनच महाग येतोय, असे विविध कारणे दुकानदार सांगत आहेत. त्या मालाची चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. खाद्यतेल, धान्य, कडधान्य साखर यांच्या दरामध्ये ही लक्षणीय वाढ दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत खाद्यतेल एका डब्याच्या मागे जवळपास दीडशे ते अडीचशे रुपये एवढ्याने महागलेले आहे. तीच परिस्थिती इतर साहित्यांची देखील आहे. त्यात तीस ते पस्तीस रुपयांनी विकली जाणारी ज्वारी पंचेचाळीस ते पन्नास रुपयांवर पोहोचली आहे.
जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकल्यास कारवाई केली जाईल असे पुरवठा अधिकारी म्हणत असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही. याचे कारण विचारल्यास आमच्याकडे एकही लेखी तक्रार आली नसल्याचे सांगण्यात येते. काल खासदार हिना गावित यांच्या आढावा बैठकीत चर्चे दरम्यान चढा दराने वस्तू विक्रेत्यावर लगाम लावा असे खासदार हिना गावित यांनी सांगितले दरम्यान यावेळी उपस्थित एका पत्रकाराने याबाबत प्रसारित झालेले वृत्त व्हाट्सअप्पवर संदेश पाठवून याबाबतचे माहिती दिली होती मात्र तरीही कारवाई न झाल्याने त्यांनी याबाबतची नाराजही खासदार व आमदार गावित यांना बोलून दाखवल्या नंतर त्या विषयावर चर्चा करण्यात आली. खरे पाहता तक्रार आल्यावर पुरवठा विभागाला संबंधित दुकानदारावर कारवाई करणे बंधनकारक आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात लूट होताना पाहूनही अद्याप पावेतो कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासन तक्रारीची वाट पाहत असल्याचा गैरफायदा व्यापारी मात्र घेत आहे. मात्र व्यापारी पक्के बिल देत नसल्याने तक्रारदारास तक्रार करणे अवघड होतं आहे.
चौकट***
शहरातील व्यापारी 95 रुपयांचे तेल पाऊच 105 ते 110 रु प्रमाणे तर 35 रु किलो किमतीची साखर 40 ते 45 रु अश्या चढ्या दराने विक्री करून लूट करत आहेत. तर शहरातील अन्नछत्र परिवारा मार्फत त्यांचे सदस्य पुतन दुबे व संतोष माळी हे स्वयंसेवक व्यापाऱ्यांकडून होलसेल भावाने तेल पाऊच 95 रु व साखर 36 रु अश्या आलेल्या दरात ना नफा ना तोटा या तत्वावर शहरवाशियाना उपलब्ध करून देत आहे. दरम्यान या तरुणांना अधिकचा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी दै.पुण्यनगरीच प्रस्तुत प्रतिनिधी यांनी खासदार हिना गावित व आमदार विजय कुमार गावित यांच्याकडे आढावा बैठकी दरम्यान केली.
Comments
Post a Comment