शिव भोजनथाळी नगरसेवकांचा पुढाकार
लॉकडाऊन पर्यत नगरसेवकांनी उचलला शिवभोजन केंद्रावरील लाभार्थ्यांचा खर्च
सुनील सुर्यवंशी
तळोदा: तळोदा येथे तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्रात जेवण करणाऱ्या लाभार्थ्यांचा खर्च तळोद्याच्या प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेवकांनी उचलला आहे. याबाबत तहसीलदार व शिवभोजन केंद्र चालकांना पत्र देऊन लोकांकडून वसूल करण्यात येणारा मोबदला ते स्वखर्चाने करणार असल्याबाबत नगरसेवकांनी कळविले आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब व मजूरांवर बेरोजगारीच्या संकट ओढवले आहे. अश्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना पोटभर जेवण मिळावे यासाठी शासनाकडून तळोदा येथे दोन शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून दररोज २०० गरजु लोकांना नाममात्र शुक्ल आकारून भोजन दिले जात आहे. परंतू शिवभोजन केंद्रात नाममात्र शुल्क आकारून जरी भोजन मिळत असले तरी हातावर काम करुन पोट भरणाऱ्या कुटुंबाला आपल्या कुटुंबासाठी रोज एकावेळीस ४० ते ५० रूपये देणे देखिल सद्यस्थितीत जिकरीचे होत आहे. त्यांच्यातील काही लोकांनी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी व काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे नगरसेवक म्हणून परिचित असणाऱ्या या नगरसेवकांनी पैश्या अभावी शिवभोजन केंद्रावर जेवायला येणारा एक ही नागरिक उपाशी पोटी परत जाऊ नये यासाठी तळोदा शहरात सुरू केलेल्या शिवभोजन केंद्रात जेवण करणाऱ्या २०० नागरिकांच्या शुल्काचा भार स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात त्यांनी तळोद्याचे तहसिलदार पंकज लोखंडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली व निवेदन दिले. निवेदनात दिनांक १४ एप्रिल पर्यन्त शिवभोजन केंद्रावर जेवनासाठी येणाऱ्या लोकांकडून कुठलाही मोबदला घेऊ नये, तो सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने केंद्र चालकास देऊ असं आश्वासन दिले आहे.तहसीलदारांनी होकार दर्शविल्यानंतर त्यांनी शहरातील दोन्ही शिवभोजन केंद्र चालकांना देखिल पत्र देऊन याबाबत कळविले.
संपूर्ण लॉकडाऊन असे पर्यत म्हणजे १४ एप्रिल पर्यत शहरातील दोन्ही शिवभोजन केंद्रांवर जेवण करणाऱ्या २०० लाभार्थ्यांचे शुल्क हे प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक केंद्र चालकांना अदा करणार आहेत. यासाठी त्यांना दररोज सुमारे एक हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यांच्या या अनोख्या सामाजिक दातृत्वामुळे तळोदा शहरातील २०० गरीब व निराधार लोकांच्या दर्जेदार व मोफत जेवनाची सोय होणार आहे.
Comments
Post a Comment