कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबात ई-बैठक
जिल्ह्याच्या सीमेवरील गावात दक्षता घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
प्रतिनिधी तळोदा
- कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचादेखील वापर करण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
ते म्हणाले, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सीमेवरील गावांची यादी तयार करावी. या गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात यावे. या दलात गावातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी, एनएसएस किंवा एनसीसीचे विद्यार्थी, उपक्रमशील युवकांचा समावेश करण्यात यावा. ग्राम सुरक्षा दलामार्फत 8 तासाच्या तीन पाळ्यांमध्ये गावात येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात यावे.
शेजारील जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती गावात येणार नाही किंवा गावातील कोणतीही व्यक्ती शेजारील जिल्ह्यात जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नागरिकांसोबत वाद टाळावेत व ग्राम सुरक्षा दलाने कोणताही बळाचा वापर करू नये, आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घ्यावी.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात संशयित व्यक्तींच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधांची वेष्टणे व इतर अनपयुक्त साहित्य पिवळ्या रंगाच्या वेगळ्या पिशवीत एकत्रित करण्यात यावे. बाहेरील जिल्ह्यातून वैद्यकीय कारणासाठी पास घेऊन आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात यावे.
रेशन दुकानदारांमार्फत अन्नधान्याचे योग्य प्रमाणात व नियमानुसार वितरण व्हावे यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी दुकाननिहाय एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. गावातील प्रतिनिधी आणि नियुक्त कर्मचाऱ्यासमोर धान्य वाटप होईल याची दक्षता घ्यावी. गैरप्रकार आढळल्यास चौकशी करून त्वरीत कारवाई करावी.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरूस्तीची कामे करण्यासाठी परवानगी देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असून ही कामे वेळेत होतील याकडे संबधित यंत्रणेने लक्ष द्यावे. स्थानिक कामगार निवडण्यावर अधिक भर द्यावा. कामगारांची फारशी वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी पुरवठा, गटारीची कामे, महत्वाचे रस्ते आदी कामांचा यात समावेश असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मौजे लहान कडवान येथील दुकानाचा परवाना रद्द
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नवापूर तालुक्यात मौजे लहान कडवान येथील सतीश गावीत यांचे स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी आदेशान्वये रद्द केले आहे.
या स्वस्त धान्य दुकानातील दुकानदार नियमापेक्षा कमी धान्य देत असल्याचे व त्यासाठी अधिक रक्कम घेत असल्याबाबत चित्रफीत पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली होती. या चित्रफीतीत ग्राहकांच्या शंकाचे समाधान करण्याऐवजी त्याच चित्रीकरण करण्यास दुकानदाराने विरोध केला असल्याचे दिसून येत आहे. या चित्रफीतीची शहानिशा करून पुरवठा विभागामार्फत दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसीलदारांनी सदर दुकान नजीकच्या दुकानास जोडण्याची कार्यवाही करावी व एप्रिल 2020 चे धान्य ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांसमक्ष वाटप करावे,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
साभार जी,म,का, नंदुरबार
Comments
Post a Comment