विलगीकरण कक्षातील स्थलांतरित मजुरांच्या अस्थिर आयुष्याला समुपदेशनाचा आधार
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम
तळोदा :(सुधाकर मराठे) कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्याबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत समुपदेशन सेवा पुरवण्यात येत आहे.
लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातच अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी तळोदा प्रकल्पाच्या माध्यमातून निवास केंद्राची सोय करण्यात आली आहे. कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ४ स्थलांतरित मजुरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या या स्थलांतरित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या उत्तम मानसिक आरोग्याची खबरदारी घेण्यात येत आहे.
या चार मजुरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असताना त्यांच्याशी प्रकल्प अधिकार्यांनी संवाद साधला. दिवसाची मजुरी नाही, घरी परत जाता येत नाही, कुटुंबाशी संवाद होत नाही, अशा परिस्थितीत विलगीकरण कक्षात ठेवल्यावर या मजुरांना भावनिक संवादाची गरज असल्याचे अविशांत पंडा यांच्या निदर्शनास आले. यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण आणि ल्युपिन फाउंडेशनचे तान्हाजी मारुरे यांच्या सहकार्याने विलगीकरण कक्षात असलेल्या स्थलांतरित मजुरांचे सतत समुपदेशन करण्यात येत आहे.
“आम्ही या प्रवासी कामगारांना खाण्यासाठी मुक्काम आणि वैद्यकीय आवश्यक वस्तू पुरवत आहोत. या मजुरांचा तणाव दूर ठेवण्यासाठी त्यांना भावनिक पाठिंबा आणि समुपदेशनाची आवश्यकता आहे. सुप्रीम कोर्टानेसुद्धा अशा सुविधांमध्ये समुपदेशकांची गरज असल्याचे सांगितले आहे, यानुसार आम्ही ल्युपिन फाऊंडेशनशी संवाद साधून हे समुपदेशन सुरू केले आहे. सध्या हे समुपदेशन केवळ विलगीकरण कक्षातील मजुरांसाठी सुरू असले तरी लवकरच इतर स्थलांतरित मजुरांसाठी हे समुपदेशन सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे."
अविशांत पंडा
प्रकल्प अधिकारी,
तळोदा आदिवासी विकास प्रकल्प
Comments
Post a Comment