तलोद्यातील तरुणांचा जुगाड लॉक डाऊन मध्ये तयार केलं कापणी यंत्र फावल्या वेळेत लावला शोध
तळोदा
केळी, पपई, एरंडी व कापूस यांसारखे पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्या पिकांचे खांब शेतातून काढण्यासाठीचे एक कटाई मशीन हंसराज राजकुळे यांनी विकसित केले आहे. वडिल शेतकरी असून पेरणी मशीन भाड्याने देण्याच्या व्यवसाय असल्याने लहान पणा पासूनच काहीतरी नवीन अवजारे तयार करण्याचे स्वप्न व जिद्द असल्याने नवनवीन प्रयोग ते करत असतात. या मशिनमुळे शेतकऱ्यांची आर्थिक व वेळेची बचत तर होणारच आहे पण सदर पिकांचे बारीक - बारीक तुकडे होवून त्यापासून खत देखील तयार होणार आहे. सदर मशीन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे....
शेतकऱ्यांनी केळी, पपई, कापूस व एरंडी यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर विशेषतः केळी व पपईचे खांब काढणीसाठी व काढलेले खांब इतर ठिकाणी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तसेच अनेकदा काढलेले ते खांब नदी किंवा नाल्यात फेकण्यात येतात त्यामुळे बऱ्याचदा नदीतून अथवा नाल्यातून पावसाचे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आपल्याकडे इतर अवजारे व यंत्र असल्याने काम करणे सोपे होते तसेच काहीतरी नवीन उपयोगी यंत्र बनवून हे अडथळे दूर करण्यासाठी शहरातील हंसराज राजकुळे या युवकाने आपल्याच वर्क शॉप मधील काही टाकावू वस्तू तर काही नवीन वस्तू विकत घेवून केळी, पपई, एरंडी, कापूस आदी पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांचे खांब काढण्यासाठी एक कटाई मशीन तयार केले आहे. या मशिनमुळे सदर पिकांच्या खांबांचे बारीक - बारीक तुकडे होवून ते जमिनीत मिसळून त्यापासून खत तयार होवून मातीची सुपीकता वाढेल. हंसराज राजकुळे यांनी 2 दिवसांपूर्वीच हे कटाई मशीन तयार झाले असून त्याचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांचा शेतातील केळीचे पिकांचे खांब काढण्यासाठी करण्यात आला आहे व तो मोठ्या प्रमाणावर यशस्वी देखील झाला आहे. हे मशीन पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक गर्दी करीत आहेत.
हे कटाई मशीन ४५ एच. पी. व त्यापुढील ट्रॅक्टरला जोडल्यावर काम करते. ट्रॅक्टरच्या पुढील भागाद्वारे खांब खाली पाडण्यात येते व त्यानंतर खाली पडलेले खांब ट्रॅक्टरच्या खालून ट्रॅक्टरला जोडलेल्या या मशीनमध्ये जाते व त्यानंतर मशीनचा धारदार पात्यांमध्ये खांब आल्यानंतर त्याचे लहान - लहान तुकडे होतात. हेच तुकडे जमिनीत मिसळल्यानंतर त्यापासून खत तयार होते....
साधारणतः १० एकर शेतातील केळीचे खांब काढण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व मजूर मिळून जवळपास २० - २५ हजार खर्च येवून ७ दिवसांचा कालावधी लागतो, मात्र या मशिनच्या सहाय्याने ते खांब १ दिवसात निघू शकतात व त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. त्यामुळे या मशीनच्या सहाय्याने पपई, एरंडी व केळीचे खांब काढल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वेळेची बचत होणार आहे.
या युवकाने बारावी नंतर आयटीआय केले असून या आधीही त्यांनी बोअरवेल मधील मोटार काढण्यासाठी मशीन व जनरेटर्स बनविले आहे. त्यांनी हे मशीन तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मधील पत्रा, ४ इंच सी चॅनेल, पाटा, एक्सेल, पिष्टन इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. मशीन बनविण्यासाठी त्यांना ७ दिवस लागले असून त्यासाठी त्यांना भुषण सुर्यवंशी, रमेश मगरे, सुरेश पाडवी, लक्ष्मण ड्रायव्हर यांनी मदत केली आहे....
Comments
Post a Comment