फटाके दुकान साठी मार्गदर्शक सूचना व नियम सह परवानगी
फटाके दुकान व परवान्यासाठी
मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
(जिमाका वृत्तसेवा)
दि. 12: दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
फटाके विक्रींची जागेची निवड करतांना एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगामधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत, ते मागील बाजुने बंद असावेत. तात्पुरते शेड हे लोखंडी पत्र्याचे किंवा सिमेंटच्या पत्र्याचे बांधण्यात यावेत. दोन स्टॅालमधील अंतर तीन मीटर असावे. राहत्या वस्तीपासून, जागेपासुन, इमारती पासुन स्टॉलचे अंतर 50 मीटर असावे.
शेड, स्टॉल एकमेकांसमोर तोंड करुन नसावेत. दुकानात फक्त विद्युत दिव्यांचा वापर करण्यात यावा. विद्युतदिवे छताला पक्के लावावेत, लोंबते ठेवून नयेत. प्रत्येक स्टॉलच्या रांगेत एक मास्टर स्वीच असावे. स्टॉल जवळ फटाके उडविण्यात येवू नयेत. फटाके दुकानाचे शेड, स्टॉल सरकारी, खाजगी जागेत असल्यास जागा मालकांची परवानगी असावी. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था, आणि पाण्याचे साठे (टँकर ) ठेवणे आवश्यक असेल. स्टॅालमध्ये अग्नि उपद्रवास कारणीभुत ठरणाऱ्या वस्तू प्रतिबंधीत असेल. फटाका विक्री परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी.
फटाका विक्री करताना फटाक्यासाठी 100 किलो ग्राम व शोभेचे झकाकणारे चायनिज फटाक्यासाठी 500 किलो ग्राम एवढा परिमाणापेक्षा जास्त परिमाण बाळगता येणार नाही. आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतुन किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही.
पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासुन 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. तर साखळी फटाक्यांत 50, 50 ते 100 व 100 त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115, 110 व 105 डेसीबल एवढी असावी. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दारुकाम व फटाक्याचा वापर करता येणार नाही.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्रात शांतता प्रभागात फटाक्याचा वापर करता येणार नाही. फटाका विक्री परवाना दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. परवाना मिळाल्याखेरीज फटाका विक्री करणे अवैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फटाका विक्री व साठवणुकीसाठीचा विहीत नमुन्यातील परवानगी अर्ज 12 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर पर्यंत वितरीत करण्यात येतील व अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोंबरपर्यंत राहील. कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव विचारात घेता फटका स्टॉलच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वे, आदेश तसेच सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
साभार जी,म, का, नंदुरबार
Comments
Post a Comment