संत-महंतांच्या उपस्थितीत बालदा येथे भव्य वारकरी संमेलन उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी तळोदा:---
(किरण पाटील)
संत-महंतांच्या उपस्थितीत बालदा येथे भव्य वारकरी संमेलन उत्साहात संपन्न!
कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचा द्वितीय वर्धापन दिन थाटात; कुकरमुंडा-निझर तालुका कार्यकारिणीची स्थापना
वारकरी संप्रदायाची परंपरा, संतविचारांचा प्रचार-प्रसार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे भव्य वारकरी संमेलन शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी गुजरात राज्यातील बालदा येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. कान्हादेश वारकरी सेवा मंडळ तळोदा तालुका यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच कुकरमुंडा-निझर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी स्थापना सोहळ्यानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील वारकरी बांधव, संत-महंत, महाराज मंडळी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
वारकरी संप्रदायाची महान संतपरंपरा जतन करणे, संतांचे विचार आणि आध्यात्मिक संस्कार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे, तसेच नवीन पिढीमध्ये भक्ती, संस्कार आणि सेवाभाव रुजविणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. संतांच्या विचारांतून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांचे निर्मूलन, सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि मानवसेवेचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. उद्धवजी महाराज कुकरमुंडेकर होते. यावेळी ह.भ.प. संतोषजी महाराज (निसरपूर-खेतिया), ह.भ.प. शुभमजी महाराज (मंदाणेकर), ह.भ.प. सुभेदानंदजी महाराज (धारेश्वर तीर्थ), ह.भ.प. बाळूजी महाराज अवसरे, ह.भ.प. राजेंद्रजी कुलकर्णी (तळोदा) आदी संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, विश्वस्त आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या संमेलनाला धुळे, नाशिक, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, पानसेमल, कुकरमुंडा, निझर आदी परिसरांतून वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तीन राज्यांतील वारकरी बांधवांची एकत्रित उपस्थिती हे या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.
कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे संघटन अधिक बळकट करणे, संतपरंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, या दिशेने मंडळाची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालदा येथील ग्रामस्थ, युवा मित्रमंडळ आणि वारकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अक्षयभाऊ कुलाल व ह.भ.प. विनोदभाऊ गरुड यांनी केले, तर आभार प्रदर्शन ह.भ.प. सचिनभाऊ पाटील यांनी केले.
संत-महंतांचे आशीर्वाद, हरिनामाचा गजर, भक्तिमय वातावरण आणि तीन राज्यांतील वारकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे बालदा येथील हे संमेलन वारकरी संप्रदायाच्या ऐक्याचे आणि संघटनशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
Comments
Post a Comment