तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज; बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त
प्रतिनिधी तळोदा :--
तळोदा तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभाग सज्ज;
बियाण्यांवरील काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खत व बियाणे वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. खत व बियाण्यांची साठेबाजी, काळाबाजार तसेच निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री रोखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
ही पथके विक्री केंद्रे, गोदामे आणि साठा ठिकाणांवर अचानक तपासणी करून उपलब्ध साठा, विक्री नोंदी आणि दरांची पडताळणी करणार आहेत. तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करणे, पावती घेणे, सरलबंद पाकीट तपासणे, वजन व किमतीची खात्री करणे तसेच खरेदीचे नमुने व टॅग जपून ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पावती न घेतल्यास भविष्यात तक्रार नोंदविणे कठीण होऊ शकते, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
दरम्यान, अधिक दर आकारल्यास किंवा निकृष्ट दर्जाचा माल आढळल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच विक्रेत्यांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करून शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक यंत्रणा कार्यान्वित ठेवली असून तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षही सुरू करण्यात आला आहे. भरारी पथकांच्या प्रमुखपदी श्रीमती निलीमा मोतिराम वसावे यांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही पथके बाजारातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवणार आहेत.
प्रतिक्रिया:
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बियाणे व खतांची विक्री पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. भरारी पथकांच्या माध्यमातून नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
मिनाक्षी वळवी तालुका कृषी अधिकारी
Comments
Post a Comment