उभ्या गाडीचा टायर फुटल्याने चालकाचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी तळोदा:--
तळोदा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी सुमारे ९:४५ वाजण्याच्या सुमारास तळोदा बायपास परिसरात ट्रकच्या टायरचा स्फोट होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, सानेश्वर दिलीप मिस्तरी (वय ३७, रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गुजरातमधील नशिराबाद येथून सिमेंटच्या गोण्या भरून तळोदा येथे आले होते. घटनेच्या वेळी ते ट्रक क्रमांक MH १८ BG२८७४ च्या टायरमध्ये हवा तपासत होते. त्याच वेळी अचानक टायरचा जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचा आवाज प्रचंड होता आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्राथमिक तपासात टायरमधील जास्त दाबामुळे हा स्फोट झाल्याचे समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कष्टकरी चालकाचा अशा अचानक अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment