शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली.
प्रतिनिधी तळोदा :--(किरण पाटील)
विकासकामांना चालना मिळावी आणि त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलावा यासाठी तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहराच्या विविध मूलभूत सुविधा आणि विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळोदा नगरपालिकेला विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) तळोद्यात घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. या पार्श्वभूमीवर तळोद्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेत शहरातील विकास कामांसंदर्भात चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती दिली. तसेच तळोदा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आधुनिक सोयीसुविधांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले. नगराध्यक्षा चौधरी यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष निधीची मागणी देखील यावेळी केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नगराध्यक्षांना आश्वस्त केले की, तळोदा हे आमच्यासाठी महत्त्वाचे शहर असून, स्थानिक प्रशासनाने मांडलेले सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर केले जातील. नगरपरिषदेने मांडलेल्या विकास आराखड्याला शासन पूर्ण सहकार्य करेल. शहराच्या विकासात आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही. निधीच्या अभावामुळे कोणतेही काम थांबणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. या महत्त्वपूर्ण भेटीवेळी नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांच्यासोबत त्यांचे पती तथा पॅनल प्रमुख योगेश चौधरी, शहादा येथील नगराध्यक्ष अभिजीत पाटील हे उपस्थित होते. दरम्यान नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. या भेटीमुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून रखडलेल्या विकासकामांना आता नवी गती मिळेल अशी अपेक्षा त्यांच्यामधून व्यक्त करण्यात येत आहे.
************
मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील विविध विकास कामांबाबत तसेच विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तळोद्याच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करीन आणि यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन देखील दिले.
: भाग्यश्रीताई चौधरी
नगराध्यक्षा, तळोदा.
Comments
Post a Comment